Congress News : डॅमेज कंट्रोलसाठी नेमले चार निरीक्षक, पण नांदेडात पोहोचले एकच
- Anant Suralkar
- Feb 16, 2024
- 1 min read
काँग्रेस सोडून अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले. हा आपल्यासाठी खूप मोठा धक्का आहे. पण या धक्क्यातून सावरू व पक्ष बळकट करू, असा निर्धार नांदेड काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. अशोक चव्हाण यांच्यानंतर जिल्ह्यात उरलेली काँग्रेस सावरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चार निरीक्षक नेमूण जिल्ह्याचा आढावा घेण्यास सांगितले होते. परंतु चार पैकी छत्रपती संभाजीनगरचे शेख युनूस एकटेच नांदेडमध्ये आढावा घेण्यासाठी आले होते. इतर तीन निरीक्षक हे Congress च्या महाबळेश्वर येथील शिबाराला गेल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे शेख युनूस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत आपण सगळे मिळून पुन्हा काँग्रेस बळकट करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीला नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकारण गेली चार दशके चव्हाण कुटुंबाभोवती फिरले आहे. नांदेडमध्ये काँग्रेसचे सर्वेसर्वा अशोक चव्हाण राहिल्याने ते म्हणतील ती पूर्व दिशा असायची. आता त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसच्या जिल्ह्यातील अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले.