असली सेना आणि नकली सेना कुठली हे मोदींनी सांगायचं म्हणजे कहर झाला: उध्दव ठाकरे
- Anant Suralkar
- Apr 9, 2024
- 2 min read

मुंबई (प्रतिनिधी) 09 एप्रिल 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसबरोबर आहे. नकली शिवसेना आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काश्मीरमध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांची घरं जाळण्यात आली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या विरोधात उभे राहात भूमिका घेतली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे असं नाही म्हणाले की काश्मीरमध्ये आग लागली आहे तर महाराष्ट्रातल्या लोकांचा काय संबंध? काँग्रेससह आहे ती नकली शिवसेना आहे. मला आनंद आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहेत.” असं मोदींनी म्हटलं होतं.
यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं यावर ते म्हणाले की, नकली सेनेबद्दल म्हणाल तर ज्यावेळी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदी हिमालयात असतील, मला कल्पना नाही. आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्रातल्या बाहेरच्या माणसाने येऊन असली सेना आणि नकली सेना कुठली हे सांगायचं म्हणजे कहर झाला. यांचा पक्ष खंडणीखोर पक्ष आहे. चंदा दो आणि धंदा लो असं धोरण आहे. निवडणूक रोख्यांच्या विषयातून सगळं समोर आलं आहे. मुंबईत पूर्वी असं एक वातावरण होतं की मारुती वन थाऊजंड गाडी कुणी घेतली की त्याला खंडणीचे फोन यायचे. त्याच्याकडून खंडणी उकळली जायची. तसं हे खंडणीचं केंद्र झालं आहे. अशा या खंडणीखोर पक्षाचे नेते शिवसेनेला नकली ठरवून गेले. त्यांना मला सांगायचं आहे की कृपा करुन इतिहासाचा अभ्यास तपासून बघा. २०१९ मध्ये तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह हे मातोश्रीवर आले होते, बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोपुढे त्यांनी लोटांगण घातलं होतं. त्यावेळी मी होतो आणि आमची हीच शिवसेना होती. तुम्हाला मोदींना जरी तो विसर पडलेला असला तरीही महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. खंडणीखोर पक्षाच्या नेत्याने शिवसेनेला असं म्हणणं योग्य नाही. यांना शिवसेनाही गुजरातला पळवायची होती. ती मी पळवू दिली नाही म्हणून त्यांच्याबरोबर जो चायनीज माल बसला आहे त्यातच ते सुख मानत आहेत. त्यांचं सुख त्यांना लखलाभ असं प्रदीर्घ प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.